पाणी म्हणजे जीवन. रोजचं जगणं म्हणजे देखील जीवन. या जगण्यासाठी कोणाला काय यातना, कसरती कराव्या लागतील याचा नेम नाही. आणि दुर्दैवाने ते कष्ट चुकतही नाहीत.
नाशिकच्या अगदी जवळ (अंदाजे दीड तास) काही महिलांना हंडाभर पाण्यासाठी रोजच मृत्यूला हात लावून यावे लागते हे विदारक सत्य आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायतीच्या परिसरात बारा पाडे असून गावातील अनेक कुटुंबे शेतीसाठी पाड्यापासून दीड किमी वरील ‘तास‘ नदीच्या काठी वास्तव्यास आहेत. पंचवीस वस्त्यांममधील आदिवासींची संख्या तीनशेहून अधिक असून इथल्या महिलांना रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर टाकण्यात आलेल्या लाकडांच्या बल्ल्यांवरून चालत जाण्याची कसरत करावी लागते जी डोंबाऱ्यांपेक्षाही भयानक आहे. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आदिवासी हा शब्द इंग्रजांनी बनविला आहे आणि तो अपमानास्पद आहे; त्यांना वनवासी म्हटले पाहिजे पण सर्वसाधारण लोकांना आदिवासी म्हटले की पटकन कळते म्हणून तोच शब्द मी वापरत आहे; क्षमस्व.
अनेक सरकारी योजना गावात येतात; परंतु वस्त्यांपर्यंत पोहोचत नाहीत, ही अनेक ठिकाणांप्रमाणे इथल्याही आदिवासींची व्यथा आहे. वस्तीपासून नदी जवळ आहे; पण पाणी शुद्ध नसल्याने झऱ्यांमधून महिलांना पाणी आणावे लागते. झरे नदीच्या पलीकडे असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत महिलांना करावी लागते. हरसूल कडून येणारी ‘तास’ नदी येथून वाहते. या नदीचे पात्र पंचवीस ते तीस फूट खोल असून नदीच्या दोन्ही बाजूला काळे पाषाण असल्यामुळे नदी पलीकडे जाणे ही एक भयावह कसरत आहे. पाण्याच्या निमित्ताने दररोज जगणे-मारण्याचा संघर्ष महिलांच्या नशिबी आला आहे. बल्लीवरुन पाय घसरल्यास थेट खोल नदीत पडण्याची शक्यता असते; अनेक ग्रामस्थ नदीत कोसळले आहेत. याच प्राणावर बेतणाऱ्या सागाच्या बल्लीवरुन विद्यार्थी हरसूल, पेठ आदी भागात शिक्षणासाठी जातात. परिसरातील इतर नद्यांवर पूल बांधले गेले आहेत. मात्र तास नदीवर पूल न झाल्याने दुष्काळातील तेरावा महिना दूर व्हायला तयार नाही. ही समस्या दूर करण्यासाठी नदीवर लोखंडी पूल व्हावा अशी ग्रामस्थांची रास्त मागणी.
वस्तीकडे येण्यासाठी सावरपाडा ते शेंद्रीपाडा रास्ता व्हावा अशी आदिवासींची मागणी गेली अनेक वर्षे आहे. सावरपाडापासून हरसूलला जाण्यासाठी चाळीस रुपये लागतात. हा रस्ता झाल्यास वीस रुपये भाडे पुरेसे ठरणार आहे.
ग्रामस्थ नदीच्या बाजूला शेती करत असले तरी वीज नसल्याने पाण्याचे इंजिन लावणे परवडत नाही. पावसाच्या भरवशावर पिके घ्यावी लागतात. वीज जोडणी झाल्यास बारमाही पिके घेता येतील.
हे आपल्याला कळलेले एक उदाहरण; अशी शेकडो, हजारो फक्त महाराष्ट्रात असतील. आता विचार करा, कुठे कुठे आणि कोण कोण मदतीच्या हाकेला ओ देणार? आभाळच फाटलंय; ठिगळ लावायचे तरी कसे?
मन फार विषण्ण होते. एकीकडे आपण आपली इकॉनॉमी पाच ट्रिलियन डॉलर कधी होणार याच्या मोठ्या चर्चा करतो आणि दुसऱ्या बाजूला असे विदारक चित्र दिसले की गोंधळून जायला होते. आपल्या अर्थव्यवस्थेत होणारी वाढ ही आर्थिक विषमता अजून मोठी करते आहे असेच दिसते. याचे भविष्यात खूप मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील. यातच सामाजिक क्रांती आणि युद्धाची पाळेमुळे जडली आहेत. परंतु दुर्दैवाने त्याची चिंता कोणाला आहे असे दिसून येत नाही.
@ यशवंत मराठे