सांडपाण्याचा निचरा

MPA, Nashik

(हे काम आमच्या नीरजा संस्थेने केलं नसलं तरी आमचे तांत्रिक सल्लागार डॉ. अजित गोखले यांचा त्यात सक्रिय सहभाग होता. अशा कामांमधून लोकांना प्रेरणा मिळो हीच इच्छा)

आज बहुतेक सर्वच ठिकाणी सांडपाणी नदी-ओढे, तलाव यांच्या पाण्याला किंवा भूजलाला प्रदूषित करीत आहे. याचा दूरगामी परिणाम फारच त्रासदायक असणार आहे. हे कसे रोखावे ही मोठी समस्या आहे.

मल-जलावर प्रक्रिया करून त्याला पूर्णतः र्निर्विष करणे हे कठीण काम आहे. यांत्रिक पद्धतीने ते करता येते परंतु यांत्रिक प्रणाली शीत कटीबंधामधे विकसित झालेल्या आहेत. तिथे, थंडीमध्ये, कमी  तापमानात, ऑक्सिजन पाण्यात तुलनेने सहज विरघळतो. आपल्यासारख्या ऊष्ण भागात ते खूपच कठीण असते. साहजिकच अशा यांत्रिक पद्धतींचा देखभाल दुरुस्ती खर्च ही आपल्याकडे अधिक असतो. ती संयंत्रे वा प्रणाली वर्षानुवर्षे चालू ठेवणे महाखर्चिक आणि त्रासदायक आहे. यामुळे आपल्याकडे वर्षानुवर्षे चालणाऱ्या यांत्रिक सांडपाणी शुद्धीकरण प्रणाली हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असतील.

 

नॅचरल सोल्युशन्सने विविध उद्योगांमध्ये, शैक्षणिक संस्थांमधे, तसेच विद्यापीठे, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, विश्रांतीगृहे यांमधे गेली दोन दशकांहूनही जास्त काळ रीडबेडचा वापर ह्या शुद्धीकरणासाठी यशस्वीपणे केला आहे. परंतु आजपर्यंत कुठल्याही सरकारी आस्थापनाने हे करण्याची तयारी दाखविली नव्हती.

ज्या ठिकाणी पुरेशी गार्डन स्पेस आहे तिथे रीड बेड सिस्टीम बनवता येऊ शकते. याचाच अर्थ बहुतेक सर्व शासकीय इमारती, शाळा-कॉलजेस, विद्यापीठे, रिसॉर्ट्स व कही हाऊसिंग सोसायटी इत्यादी ठिकाणी हे शक्य आहे. ज्या ठिकाणी मोठी गार्डन स्पेस नाही अशा ठिकाणी एक्वाट्रॉन टेक्नॉलॉजी वापरून, शौचालयातील मल वेगळा करून, उरलेल्या पाण्यावर कमी क्षेत्रामध्ये रीडबेड बसवून पाण्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. येथे एनरोबिक डायजेस्टर टाकी ऐवजी कंपोस्टरचा वापर करावा लागतो.

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांनी एक महत्त्वाचे पर्यावरणस्नेही पाऊल उचलले आहे. यात सांडपाणी शुद्धीकरणासाठी यशस्वी अशा रीड बेड सिस्टीमचा प्रभावी वापर केला आहे.

 

सदर प्रणालीचे संपूर्ण नियोजन आणि मार्गदर्शन नॅचरल सोल्युशन्स, (या क्षेत्रातील जाणकार व यशस्वी कंपनी) यांनी केले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यांचे कंत्राटदार सोनजे कन्स्ट्रक्शन्स आणि बाबजी कन्स्ट्रक्शन्स यांनी या प्रकल्पाला मूर्तरूप दिले आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी मधील सर्व वसतिगृहे आणि विद्यार्थ्यांच्या भोजनालयातील निर्माण होणारे सर्व; म्हणजे सुमारे दोन लाख लिटर सांडपाणी (शौचालये, स्नानगृहे, कपडे धुणे आणि भोजनालय येथील); येथे शुद्ध केले जाते. अकादमीच्या 152 एकरच्या विस्तीर्ण परिसरातील एका बाजूच्या उतारावर हे सांडपाणी निर्माण होते. ते उतारावरून पंप-मोटरी विना प्रवाहित करून एका ठिकाणी आणले जाते. तिथे त्याला एनरोबिक जिवाणूंच्या मदतीने, अनेक कप्पे असलेल्या एका मोठ्या टाकीमध्ये काही प्रमाणात स्थिर व शुद्ध केले जाते. येथून ते पाणी साधारण दोन ते अडीच हजार चौरस मीटर आकाराच्या आणि अडीच ते तीन मीटर खोलीच्या रीड बेड सिस्टीम मध्ये नेले जाते. येथे इनलेट चेंबर मधून सच्छिद्र पाइपाने ते पाणी दगड विटा खडी वाळू आणि माती अशा थरांनी केलेल्या गाळणी मधून पाठवले जाते. तेथून ते आउटलेट चेंबर मधे इतर सच्छिद्र पाईपांनी एकत्र केले जाते. आणि अखेरीस पॉलिशिंग पाँड येथे नेले जाते. हे सर्व काम पम्प-मोटर विना होते, किंवा कुठलीही बाह्य ऊर्जा खर्च न करता होते. या पद्धतीमध्ये विविध प्रकारच्या विशिष्ट अनुकूलित वनस्पती, एकमेकांच्या सहकार्याने नीट वाढतील अशा पद्धतीने लावल्या जातात. त्यांच्या मुळांचे घनदाट जाळे जमिनीखाली तयार होते. या वनस्पती लावण्याआधी, या गाळणीमध्ये विविध प्रकारचे अनुकूलित जिवाणू, मित्र बुरशी आणि चांगल्या मातीतील गांडूळे व तत्सम इतर जीव सोडले जातात. या जीवांच्या चयापचयासाठी, सांडपाण्यातील अशुद्धी यांचा वापर होतो. जीवाणूंच्या श्वसनासाठी वनस्पती मदत करतात. सांडपाण्यातील अमोनियाचे नायट्रेटमध्ये रूपांतर करून ते वनस्पती वापरतात. तसेच हायड्रोजन सल्फाइडचे सल्फेट मध्ये वापर करून त्याचाही वापर वनस्पतींमध्ये अथवा गाळणी मध्ये स्थिरीकरण करण्यासाठी करता होतो. फाॅस्फेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, बोरॉन, कॉपर, झिंक, मॉलिब्डेनम इत्यादी पोषकद्रव्ये वनस्पतींच्या वाढीसाठी वापरली जातात.

 

ही रीडबेड सिस्टीम नुसतेच सांडपाणी शुद्ध करत नाही तर तिची रचना एखाद्या सुंदर बगीचा सारखी केलेली आहे. त्यामध्ये अनेक अप्रतिम फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती इत्यादींचे उपयोजन केलेले आहे. एकूण सत्तरहून अधिक जातींच्या वनस्पतींची जवळजवळ दहा हजार रोपे येथे सुरुवातीला लावण्यात आली. सहा महिन्यात त्यांची संख्या वाढून आणि आकार वाढून संपूर्ण बाग आच्छादली गेली आहे. यामध्ये चार ठिकाणी पाण्याची छोटी कृत्रिम तळीही करण्यात आली आहेत. ज्यामध्ये विविध पाणवनस्पती, कुमुदिनी आणि कमळे ही जोपासण्यात आली आहेत. या तळ्यांमध्ये मासेही सोडले आहेत जेणेकरून पाणी शुद्धीकरणास मदत होते. आणि पाण्याच्या शुद्धतेची सातत्याने पडताळणी घडत राहते. मासे जिवंत आहेत याचा अर्थ शुद्धीकरणाची व्यवस्था व्यवस्थित चालते आहे. यामुळे अशा प्रकारच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या शुद्धीकृत पाण्याच्या चाचणी करता रासायनिक प्रयोगशाळांवर अवलंबून रहावे लागत नाही. तसेच त्या रासायनिक चाचण्यांस लागणाऱ्या विलंबाचा कुठला त्रास होत नाही. सदर सांडपाणी बगीच्याच्या किमान अडीच ते तीन फूट खालून वाहते. त्या सांडपाण्यामध्ये डास माशा आणि इतर उपद्रवी जीवजंतू वाढत नाहीत. संपूर्ण बागभर फेरफटका मारला तरी कुठलाही त्रास होत नाही. या बगीच्याची रचना करताना त्यात चालण्यासाठी काही पाऊलवाटाही बनवल्या आहेत. या पाऊलवाटांवरून माननीय मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मा. गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, मा. अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ  तसेच मा. पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्य ठाकरे  आणि महाराष्ट्र पोलिसचे आय.जी., डी.आय.जी. अधिकारी स्वतः चालले. कुठल्याही प्रकारची दुर्गंधी, डास, माशा किंवा रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमधे असतो तसा रसायन व जीवजंतू मिश्रित एअरोसॉल या ठिकाणी नव्हता. त्या ऐवजी सुंदर रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे आणि मधमाशांचा  गुंजारव होता. पक्षांची किलबिल होती. या पाऊलवाटा इंग्रजी 8 अशा आकाराच्या आहेत; त्यावर चालण्याने आरोग्यास फायदा होतो असे अनेक वैकल्पिक आरोग्य पद्धतींच्या उपचारकांचे मत आहे. या रीडबेडवर वाढलेल्या अनेकानेक वनस्पती, विविध प्रकारच्या मधमाशा, भुंगे, फुलपाखरे, चतुर टाचण्या आणि पक्षी यांना आहार निवारा आणि संरक्षण देत आहेत.

 

यामुळे ही नुसती सांडपाणी प्रक्रिया न राहता त्याचे जैवविविधता जोपासणाऱ्या स्थानामध्ये रूपांतर झाले आहे. या विविध जातीच्या फुलोऱ्यापासून मध गोळा करणाऱ्या देशी तसेच विदेशी मधमाशांची योजना एमपीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली आहे.

शुद्ध केलेल्या पाण्याचे कारंजे तर उडवले जातेच पण त्याचबरोबरीने एमपीएच्या विविध भागातील हरित पट्टे आणि बागांसाठी वापरले जाते. म्हणजेच आता पोलीस अकादमी त्यांच्या सिंचनाच्या गरजेसाठी महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरत नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याची साधारण दीड ते पावणे दोन लाख लिटरची दररोज बचत होते आहे. शुद्धीकरण केलेल्या पाण्यातील समतोल अन्नद्रव्यांमुळे हरित पट्ट्यांमधील वनस्पती अतिशय सुदृढ वाढत आहेत. काही भागांमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची सुद्धा लागवड केलेली आहे. तसेच अनेक वृक्ष जातींच्या वनस्पतींची ही लागवड केलेली आहे.

गावागावांमध्ये जिथे सांडपाणी शुद्धीकरणाची इतर कुठलीही यंत्रणा चालवणे केवळ अशक्य असते, अशा ठिकाणी रीड बेड किंवा अन्य प्रकारची सोपी ग्राम-रीडबेड वापरता येईल. आधी म्हटल्याप्रमाणे त्याकरता वापरण्याजोगा सोपा यंत्रविरहित पंप देखील नॅचरल सोल्युशन्सने बनवला आहे आणि त्याचे परीक्षणही केले आहे.

नुकतेच ह्या कामाची पाहणी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री श्री. छगनजी भुजबळ यांनी केली. त्याप्रसंगी त्यांनी संचालिका अश्वस्थी दोर्जे आणि नॅचरल सोल्युशनचे डॉ. अजित गोखले यांचे कौतुक केले.

 

ह्या प्रकल्पाची माहिती या व्हिडियो द्वारे देखील बघता येऊ शकेल.

 

एकंदरीत हा प्रकल्प निसर्गस्नेही, मनुष्यस्नेही, ऊर्जास्नेही असा आहे.

@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp