जल – जन – ऊर्जा

Koyna Hydro

पश्चिम भारतातील बहुतेक सर्व मोठ्या नद्या आणि उपनद्यांच्या उगमाजवळ खूप मोठमोठी धरणे बांधली गेली आहेत. महाराष्ट्रामध्ये मोठी अशी सुमारे पावणेपाच हजार धरणे आहेत. संपूर्ण देशामध्ये 14 हजार धरणे आहेत. म्हणजे अख्ख्या देशात 14000 आणि महाराष्ट्रामध्ये 4750. एवढे धरणांचे व्यस्त प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे.

 

याचं कारण काय तर आपल्याकडे धरणं बनण्याकरता अतिशय उपयुक्त अशी परिस्थिती आहे. तर ती कुठली? एक – कठीण काळा कडकडीत दगड, ज्याच्या मधून पाणी जमिनीमध्ये मुरू शकत नाही. आणि दोन – U आकाराच्या दऱ्या त्याच्यामध्ये थोडासा बांध घातला तर खूप मोठा जलाशय निर्माण करता येतो. निसर्गानी असा प्रदेश आपल्याला दिला तसेच काही प्रमाणामध्ये कर्नाटकाच्या पश्चिम घाटाला आणि केरळच्या पश्चिमेला सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे खूप मोठी धरणं ही पश्चिम घाटातच आहेत. ही धरणं काय करतात ? तर पश्‍चिम घाटावर भरपूर प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी नद्यांच्या उगमाजवळ अडवतात. धरणं आहेत ती घाटाच्या पूर्व दिशेला आहेत. पण, त्या बाजूला उतार कमी असल्यामुळे त्याच बाजूला वीज बनवता येत नाही. घाटाच्या पश्चिम बाजूला महाराष्ट्रातील व कर्नाटकातील कोकण किंवा केरळचा समुद्र सपाटीकडचा भाग येथे वीज बनवता येते; बनवली जाते. ती वीज मोठ्या प्रमाणावर आपण देशभर वापरतो. तसा विचार केला तर औष्णिक वीज आहे, अणू ऊर्जा ही आहे पण एकंदरीत जलविद्युतेचे प्रमाण खूप जास्त आहे.

 

त्यामुळे आपल्याला जे पाणी मिळतं ते आपण पूर्वेकडे जाण्यापासून रोखतो आणि त्याला पश्चिमेकडे घेऊन जातो. त्यामुळे पूर्व वाहिनी नद्या आपणच पश्चिम वाहिनी केल्या आहेत कारण वीज निर्मिती पूर्व दिशेला नाही तर पश्चिम दिशेला होते आहे. आपण पूर्व वाहिनी नद्या पश्चिम वाहिनी केल्या याचे शरीरशास्त्रातील उदाहरण घ्यायचे झाले तर अशुद्ध रक्त वाहिनीला शुद्ध रक्तवाहिनीशी जोडून टाकले आहे. जे आपल्या शरीरासाठी वाईट आहे; तेच भारत वर्षांसाठी निश्‍चित वाईट आहे आणि तेच जगासाठी सुद्धा वाईट आहे.

 

जर को-करंट (म्हणजे ज्या दिशेत पाणी वाहत आहे त्याच दिशेने) म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने ऊर्जा निर्माण करता आली तर आपल्याला हे पूर्वेकडे जाणारे पाणी पश्चिमेकडे वळवायची गरज पडणार नाही. आणि तशी पद्धत आहे जी स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्षात आणलेली आहे. आपल्याकडे सुद्धा आहे. आमच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड किंवा लडाखमध्ये ती वापरली जात आहे. त्याला वॉर्टेक्स टर्बाईन म्हणतात. त्यामधे पाण्याचा प्रवाह हा पंख्याला फिरवतो, त्या प्रवाहाच्या वजनामुळे टर्बाईन फिरत असते संवेगाने.. संवेगाचे दोन भाग, वजन आणि वेग. इथे पाण्याचे वजन भरपूर असेल वेग कमी असेल तरीही वीज बनते.

 

 

 

सद्य स्थितीतील वीज निर्मिती जास्त वेगामुळे करावी लागत असल्याने ती पश्चिमेकडे करावी लागते. मात्र वॉर्टेक्स टर्बाईनला वेगाची तेवढी अतीव जरूर नाही. प्रवाह भरपूर असला की झाले. याच्यासाठी फार मोठ्या संशोधनाची पण गरज नाही; असे टर्बाईन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु.. योजकस्तत्र दुर्लभः

 

 

 

 

कोकणामध्ये पावसात प्रवाह भरपूर असतो आणि तसा वेगही चांगला असतो त्यामुळे कोकणामध्ये को-करंट वीज निर्मिती पावसाळ्यात तरी निश्चितच शक्य आहे. तसेच घाटावरही पावसाळ्यामध्ये को-करंट वीज बनू शकेल. पावसानंतर सध्याची पद्धत वापरत राहता येईल.

 

नीरजा संस्थेच्या विद्यमाने कडवई (संगमेश्वर, रत्नागिरी) येथे बंधाऱ्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण झाले होते. त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. या बांधाच्या शेजारी स्वच्छ काळा कातळ आहे आणि त्यावरून होणाऱ्या ओवरफ्लोच्या पाण्यात छोटा वॉरटेक्स टर्बाईन व जनरेटर बसवून, त्याच्या द्वारे वीज निर्माण करण्याचा मानस आहे. तेथील परिसराचे सर्वेक्षण करून अशा कामासाठी योग्य जागा शोधली जाईल जी कदाचित आधी बांधलेल्या बांधांवरही असू शकेल.

 

हा पायलट प्रॉजेक्ट करण्याचा मुख्य उद्देश काय? तर अशा प्रकारे वीज निर्मिती होऊ शकते हे आपण आपल्या स्वतःला पटवून आणि दाखवून देणे; आणि मग लोकांना दाखवणे.

 

 

पावसाळ्यामध्ये कोकणातील मोठ्या नद्यांमध्ये, जिथे जवळजवळ चार महिने अति प्रवाह, त्याच्या नंतरच्या दोन महिने सुद्धा चांगल्यापैकी प्रवाह असतो अशा सगळ्या ठिकाणी या प्रकारांचा वापर करून को करंट वीज बनवता आली तर त्या विजेवरती संपूर्ण महाराष्ट्र काय तर पुढील 5-6 वर्षात अख्ख्या देशाला वीज पुरवू शकेल इतका प्रवाह पावसाळ्यात कोकणामध्ये असतो.

 

त्याचा परिणाम काय होईल? तर पावसाळ्यातही पूर्वेकडे जाणारे पाणी पश्चिमेकडे वळवून जी वीज बनवली जाते त्याची गरज पडणार नाही. या वर्षी चिपळूणला जो पूर आला त्याचे ते सुद्धा एक कारण होते. आणि त्यामुळे तसं न करता या मोठमोठ्या धरणांमधून पाणी पूर्वेच्या तहानलेल्या भागांना मिळू शकेल ज्यामधे, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटकचा पूर्व भाग, तामिळनाडू हे भाग येतात. त्याचा खूप मोठा फायदा शेती आणि भूजल पातळी वाढण्यात होऊ शकतो.

 

 

पूर्वी असं वाचल्याचं आठवतं की जेव्हा कोयना धरण बांधलं जात होते तेव्हा तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातल्या लोकांनी त्याचे विरुद्ध तक्रारी केल्या होत्या. काही प्रमाणामध्ये आंदोलन केली, उपोषणं केली होती. परंतु तो काळ असा होता की त्या काळामध्ये विजेची खूप जास्त गरज देशाला होती. आणि त्यामुळे देशाच्या नेतृत्वाने आंदोलनांकडे दुर्लक्ष केलं; आणि कोयना धरण पूर्ण केलं. कोयना धरण खूप छान आहे. त्याच्यामुळे मुंबई व महाराष्ट्राला खूप फायदा झाला. हे जरी खरं असलं  तरी, कोयना ही खूप मोठी नदी आहे. कृष्णा आणि कोयनेचा संगम जर आपण Google Earth द्वारे चेक केला तर असे दिसते की कोयना कृष्णेपेक्षा मोठी आहे. तिचे खूप पाणी आपण अडवले आहे. आणि ते सगळं पश्चिमेला वीज निर्माण करण्यासाठी सोडले आहे. या वर्षीच्या कोकणातल्या पुराला कोयनेच्या चार फेज मधून येणारे पाणीही कारणीभूत आहे. त्या टनेल्स मधून निघालेला चिखल आणि दगड धोंडे (त्याला टेक्निकल भाषेत ‘मकिंग‘ असे म्हटले जाते) पावसात वाहून येते; त्याच्यामुळे नदी भरून जाऊन तिची खोली कमी झाली आहे.

 

ते टाळता येऊ शकते जर आपण को-करंट वीज बनवली तर. म्हणजेच जर पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये आणि त्यानंतर जेवढे शक्य होईल तेवढी वीज महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यातील पश्चिम वाहिनी प्रवाहांवर निर्माण केली तर त्याच्यामुळे बाकीच्या पेनिन्सुलर इंडियाला जास्त पाणी मिळेल. पण हो; त्या त्या ठिकाणच्या नदीची नीट स्वच्छता करणे; त्याच्यामध्ये गाळ जास्त बसला असेल तर तो काढून बाजुला ठेवणे ही कामे करावीच लागतील. कृष्णेसारख्या कमी उताराच्या नद्यांमध्ये खास काळजी घ्यावी लागेल. परंतु तिथे पाणी बाजूला नेऊन त्याचे तलावांमध्ये साठवण करून नंतर ते वर्षभर वापरता येईल. या गोष्टीवर खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. 

 

या प्रूफ ऑफ कॅनसेप्टला खूप खर्च येणार नाही. साधारण दीड ते दोन लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे. याच्या सफलतेनंतर 10 किलोवॅट निर्मिती करणे हे पुढचे ध्येय मनात ठेवले आहे. त्याला खर्च किती येईल? बांधायला लागणारा बांध लक्षात घेऊन साधारणपणे पंचवीस ते तीस लाख. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी साहजिकच आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. या प्रकल्पाच्या यशाची आम्हाला खात्री आहे कारण तांत्रिकदृष्ट्या यात काहीच अडचण नाहीये.

 

ही वीज निर्मिती करून झाल्यानंतर किंवा करत असतानाच, सरकार दरबारी या गोष्टींचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पुढे कोण बांधील, त्यातून किती पैसे निर्माण करतील, आणि किती श्रीमंत होतील याबद्दल विचार न करता जगाला काय आवश्यक आहे त्याचा विचार करून आम्ही पहिली काही पावले उचलण्याचा विचार केला आहे. चांगलं होईलच; कारण त्यामागे निःस्वार्थी हेतू आहे.

 

आम्ही या प्रकल्पाचे नामकरण “नीरजा जलजनऊर्जा” असे केले आहे. याचे कारण हा कोकण तसेच दख्खन पठार येथील जनसामान्यांसाठी आहे.

 

या प्रकल्पाद्वारे खऱ्या अर्थाने जल साक्षरता आणि पर्यावरण साक्षरता साधता येईल असा आमचा विश्वास आहे. 

 

धन्यवाद. 

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp