(हे काम जरी आमच्या नीरजा संस्थेने केलं नसलं तरी आमचे तांत्रिक सल्लागार डॉ. अजित गोखले यांचा त्यात सक्रिय सहभाग होता याचा आम्हाला अभिमान आहे. अशा कामांमधून आम्हालाही प्रेरणा मिळते.)
या वर्षी साखरप्याची बाजारपेठ पुरात बुडाली नाही ! कोकणातील साखरप्याला गवसला पुरापासून मुक्तीचा मार्ग !
नाम फॉउंडेशन आणि नॅचरल सोल्यूशन यांच्या कामाला मिळालेले यश.
पश्चिम घाटातून वाहत कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे येणारी काजळी नदी पावसाळ्यात आपत्ती घेऊन येते, संपूर्ण बाजारपेठ आणि रहिवासी भाग पुरात जातो. पण या वर्षी हे घडलेच नाही. साखरपा पुरापासून वाचले. याला कारण गावकऱ्यांनी नदीतील गाळमुक्तीचा निश्चय केला. दगड गोट्यांच्या स्वरूपात येणाऱ्या गाळाने निर्माण झालेल्या उथळपणाने पुराच्या छायेत असलेल्या साखरप्यातील काजळी नदीची खोली वाढवून गावात घुसणाऱ्या पुराला नियंत्रित करण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.
साखरपा या गावातून वाहणारी नदी काजळी ही आहे. चिपळूणच्या वशिष्ठी नदी एवढा विस्तार नाही. पण अत्यंत वेगाने पश्चिम घाटातुन आंबा घाटातून वाहत येते आणि वेगाने जाऊन ती रत्नागिरीच्या समुद्राला मिळते.
वरून मोठे नर्मदेतले गोट्यासारखे गोटे गाळाच्या स्वरूपामध्ये येतात आणि त्यांनी नदीचे पात्र उंचावते. या नदीच्या दोन्ही बाजूला गाव आणि बाजारपेठ आहे. उथळ झालेल्या पात्रामुळे गावाला पुराचा धोका कायमच निर्माण होत असे. मागील काही वर्षापूर्वी म्हणजे 2005 च्या पुरात गावाचे खूप हाल झाले. त्यामुळे 2019 साली गावच्या लोकांनी एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढता येईल का याची चर्चा केली. यासाठी डॉक्टर अजित गोखले यांचेशी संपर्क साधला. गोखले यांनी नदीचा शास्त्रीय अभ्यास केला आणि नेमके काय काम करायचे हे निश्चित केले. त्याची दिशाही ठरली. नाम फाऊंडेशन यांनी विनामूल्य पोकलेन उपलब्ध करून दिले आणि गावकऱ्यांनी इंधनाचा खर्च केला.
लोकसहभागातून देखील थोडा निधी उभारला, तरी देखील कामाची व्याप्ती खूप मोठी होती. त्यामुळे मग 12 लाखाचे कर्ज घेण्याशिवाय पर्यायच नाही राहिला. पहिल्या टप्प्यातील या कामाला एकूण 35 लाख रुपये खर्च आला. 1 किलोमीटर परिसरात नदीचे पात्र खोल करून गाळ काढण्यात आला. खोली 4 मीटर करण्यात आली आणि पात्र दीडशे फूट रुंद करण्यात आले. मुग्धा सरदेशपांडे, प्रसाद सरदेशपांडे, गिरीश सरदेशपांडे, श्रीधर कबनुरकर तसेच नाम फाउंडेशनच्या सहकार्याने गावकऱ्यांनी हे आव्हान पेलले. कोविड, लॉकडाऊन सारखे अनेक अडथळे पार करून गाव इथपर्यंत पोचले आहे. परंतु ही फक्त सुरुवात आहे. पुढील किमान 4 वर्ष काम करीत राहावे लागणार आहे.
मे अखेर काम संपलं पण त्या कामाने देखील आज साखरपा या गावाला पुराची दाहकता तेवढे जाणवली नाही. थोडक्यात स्थानिक स्तरावरील लोकांनी पुढाकार घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन समाजाचे सहकार्य घेऊन काम केल्यास बदल निश्चित घडतो.
डॉ अजित गोखले यांची नॅचरल सोल्युशन्स ही संस्था कोकणातील ‘हाय फॉल रेन एरिया’ मध्ये काम करताना ‘नाम फौडेशन’ ला तांत्रिक सल्ला देतात. साखरपा प्रकल्पात त्यांच्या टीमने तेच केले. कोकणात 70 वर्षातील वृक्ष तोडीने नद्यात गाळ साठला आहे आणि त्या उथळ झाल्या आहेत. नद्या आता 200 फुट रुंद झाल्या आहेत; त्यामुळे पूर गावात येत आहेत. साखरप्यात हेच होत होते. साखरप्याचे सर्वेक्षण करून आराखडा केला, गावकऱ्यांनी काम केले आणि पूर गावात यायचा थांबला. कोकणात पावसाच्या पाण्याला वाहायला जागा केली पाहिजे, पावसाळ्यानंतर पाणी अडवायला सुरुवात केली पाहिजे. इतर ठिकाणचे जलसंधारणाचे तंत्र कोकणात चालणार नाही, कोकणसाठी वेगळा विचार आणि तंत्र वापरले पाहिजे.
आता नुकतेच वशिष्ठी नदीने आपल्या प्रकोपाचे दर्शन घडवले आहे आणि चिपळूण शहरात आठ फूट उंच पाणी होतं. त्यामुळे झालेली वित्त आणि मनुष्य हानी खूप दुःखद आहे. पण साखरप्याच्या गावकऱ्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
कोकणातील अनेक नद्यांसाठी हा आशेचा किरण नक्कीच आहे.
………………………………………………
साखरप्याच्या लोकांनी हुरळून न जाता भविष्यातील करायला लागणाऱ्या कामाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून डॉ. अजित गोखले यांनी गावकऱ्यांना खालील संदेश पाठवला.
काजळी मायच्या सर्व लेकरांना सादर नमस्कार. तुम्ही नाम संस्थेच्या सहकार्याने खूपच छान काम केले आहे. तुमच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. या हौराचा त्रास तुम्हाला झाला नाही हे चांगलेच आहे. परंतु धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. तुम्ही तुमचा सावधपणा कमी होऊ देऊ नका. तुमच्या वरच्या अंगाला देवडे गाव आहे. तिथले गोटे या हौरामधे प्रवाही झाले आहेत.. ते पुढील भागात आले असणार. त्यांचा साठा ज्या भागात होईल तिथे काजळीमाय परत उथळ होईल. आणि नंतर पुढच्या अतिवृष्टीत बाजारात पाणी शिरू शकेल. परंतु यात देवड्याच्या लोकांची देखील काहीही चूक नाही.म्हणूनच साधारण ऑक्टोबर अखेर नंतर आपल्या भागातील नदी पात्रात छोटे आडवे बांध घालायला विसरू नये ज्यायोगे उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही.आपली एकजूट अशीच ठेवावी आणि पुढील वाटचाल करून दीर्घ कालपर्यंत नदी पात्र स्थिर राहण्याची व्यवस्था करावी ही विनंती.
@ यशवंत मराठे